पिंपळगाव काळे (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : पिंपळगाव काळे येथून जवळ असलेल्या मोहिदेपूर शिवारात बिबट्याने अचानक धडक दिल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. १५ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तूर संगणीचे काम सुरू असताना हा थरार घडला.

. जाहिरात 👆
मोहिदेपूर शिवारातील आपल्या शेतात गणेश पांडुरंग बहादरे (वय ५०, रा. पिंपळगाव काळे) हे पळशी सुपो येथील शेतकरी शहादेव तायडे (वय ६९) यांच्यासोबत गुरांसाठी चारा काढण्याचं काम करत होते. तेवढ्यात अचानक बिबट धावत येत दोघांच्या अंगावर झेपावला. मात्र अंदाज चुकल्याने दोघांनी प्रसंगावधान राखत जवळच असलेल्या झाडाचा आधार घेत झाडावर चढून आपला जीव वाचवला.
तब्बल एक तास शेतकरी झाडावर आणि बिबट खाली असा थरार सुरू होता. घाबरलेल्या अवस्थेत गणेश बहादरे यांनी मोबाईलद्वारे आपल्या मोठ्या भावाशी विठ्ठल बहादरे यांच्याशी संपर्क साधत रडत-रडत घटनेची माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता विठ्ठल बहादरे यांनी गावातील ३० ते ४० जणांना मोटरसायकलवर एकत्र करत शेताकडे धाव घेतली. मोठा आवाज आणि आरडाओरड झाल्याने बिबट्याने पळ काढला.
विशेष म्हणजे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पिंपळगाव काळे परिसरात बिबट्याची दहशत असून याआधीही बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेनंतर गणेश बहादरे यांची प्रकृती ठीक असली तरी भीतीमुळे त्यांना प्रचंड धसका बसला आहे. मात्र पळशी येथील शेतकरी शहादेव तायडे यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळू शकली नाही.
या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच अनेक शेतकऱ्यांनी शेतात जाणे टाळत थेट घर गाठले. सध्या शेती कामाचा हंगाम असताना बिबट्याच्या भीतीमुळे अनेक कामे खोळंबली आहेत.
दरम्यान, बिबट्याचा तातडीने शोध घेऊन त्याला पकडण्यात यावे, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. वनविभागाने त्वरित पावले उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.














