Advertisement Advertisement

शेगावात खळबळ..! ओळखीचा गैरफायदा घेऊन तरुणीला लॉजवर नेले; जबरदस्तीचा प्रयत्न

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)शहरात एक धक्कादायक व खळबळजनक घटना समोर आली असून, एका २० वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत राहणारी आहे. कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून तिची ओळख आरोपी मयूर शालिग्राम खिरोडकर (वय २३) याच्याशी झाली होती. ओळख वाढल्यानंतर आरोपी मयूर हा तरुणीला वारंवार व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवत होता. मात्र, तरुणीकडून त्याला प्रतिसाद न मिळाल्याने त्याने सुरुवातीला स्वतःला इजा करण्याच्या धमक्या दिल्या.

यानंतर आरोपीने तरुणीला भेटण्यासाठी बोलावले. दोघांमधील संपर्क वाढत गेल्यानंतर आरोपी मयूरने तिला शेगाव येथील एका लॉजवर नेले. तेथे त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. तरुणीने नकार दिल्यानंतर आरोपीने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने सोबत आणलेले विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घाबरलेल्या आरोपीने तिला तात्काळ शेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला अकोला येथे हलविण्यात आले.

दरम्यान, उपचारादरम्यानही आरोपीकडून तरुणीवर पोलिसांत तक्रार करू नये म्हणून दबाव टाकण्यात येत होता. तसेच, तक्रार केल्यास कुटुंबीयांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

उपचारानंतर प्रकृती सुधारल्यानंतर तरुणीने जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठत आपली तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मयूर शालिग्राम खिरोडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे करीत आहेत.

या घटनेमुळे शेगाव शहरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!