नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून एका २४ वर्षीय विवाहितेने थेट नांदुरा पोलिस ठाण्यात धाव घेत न्यायाची मागणी केली आहे. या प्रकरणात पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सपना दिनेश तिडके (वय २४, रा. खातखेड, ता. नांदुरा, जि. बुलडाणा) असे पीडित महिलेचे नाव असून तिने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती दिनेश तिडके, सासू जनाबाई तिडके आणि सासरे माणिकराव तिडके (सर्व रा. खेट्री, ता. बाळापूर, जि. अकोला) यांनी तिला सातत्याने छळले.सुरुवातीला लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत होते.
मात्र नंतर किरकोळ कारणांवरून घरात वाद वाढले. पती दिनेश याने सासू-सासऱ्यांच्या सांगण्यावरून तिला शिवीगाळ, मारहाण केली आणि जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. इतकेच नव्हे तर तिच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाच्या संगोपनासाठी माहेरून ५० हजार रुपये आणण्याची मागणी वारंवार करण्यात आली.
या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास हेडकॉन्स्टेबल भारसाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.