डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) समृद्धी महामार्गावर १ सप्टेंबर रोजी पहाटे झालेल्या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला.
मुंबईहून नागपूरकडे जाणारा कंटेनर (क्र. NL-01-AA-8018) महामार्गावरील चॅनेल क्र. २७३ जवळ समोर जाणाऱ्या अज्ञात वाहनाला मागून धडकला. धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की हरियाणातील हनीफ जहाण (३७, रा. बिच्चार भवन, रामनगर) हा चालक स्टीअरिंगमध्ये अडकून ठार झाला.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस एपीआय संदीप इंगळे, दीपक पिटकर, एएसआय विठ्ठल खोडे, योगेश शेळके, क्यूआरटी पथक तसेच डोणगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी आनंद चोपडे घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने चालकाला बाहेर काढण्यात आले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. याप्रकरणी डोणगाव पोलिस ठाण्यात कक्ष सेवक आत्माराम गंगाराम काकडे यांच्या तक्रारीवरून मर्ग दाखल करण्यात आला आहे.