बीबी (बुलडाणा कव्हरेज न्युज) — समृद्धी महामार्गावर बीबी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत एक सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई १९ ऑक्टोबर रोजी खळेगाव परिसरात नागपूर-मुंबई लेनवर करण्यात आली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच-४० सीडी ०७३५ क्रमांकाचा आयशर कंटेनर महामार्गावर संशयास्पदरीत्या उभा असल्याचे गस्तीदरम्यान पोलिसांना दिसले. चौकशीसाठी थांबविल्यानंतर चालकाने खोटे नाव सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कसून चौकशी केल्यानंतर त्याची खरी ओळख पटली.
तो आदिल उर्फ मोहम्मद मेराज मोहम्मद मुस्तकीम (रा. सोभिपूर, जि. प्रतापगढ, उत्तर प्रदेश) असा असून, त्याच्याकडे सिल्व्हर रंगाचे देशी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, मोबाईल, ट्रक (किंमत सुमारे १० लाख) आणि ४,२०० रुपये रोख असा एकूण १० लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला.
आरोपीविरुद्ध विना परवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठवले आहे.











