भरोसा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) –चिखली तालुक्यातील भरोसा गावात आत्महत्या केलेल्या थुट्टे दाम्पत्याच्या कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे युवा नेते व आमदार रोहित पवार यांनी आज भेट दिली. त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन करत शासन दरबारी मदतीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांनी थेट बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून संबंधित कुटुंबाला तातडीने मदत मिळावी यासाठी सूचना दिल्या. त्यांनी शासनाच्या धोरणांवर सडकून टीका करताना म्हटले की, “ही आत्महत्या नसून अपघात असल्याचे भासवून आठ लाख रुपयांची मदत मिळवून देण्यासाठी गावातल्या एका अधिकाऱ्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे.”
“शेतकऱ्यांना निवडणुकीत कर्जमुक्ती, पीकविमा, शेतमालाला भाव असे अनेक गोड आश्वासने देण्यात आली होती. मात्र ती पूर्णपणे हवेतच विरली. आज या थुट्टे कुटुंबाच्या मृत्यूला हेच अपयशी शासन कारणीभूत आहे,” असे परखड शब्दांत रोहित पवार यांनी सांगितले.
या प्रसंगी रोहित पवार यांच्या हस्ते सामाजिक बांधिलकी म्हणून गजानन वायाळ आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळू पाटील यांनी ₹५१,०००/- ची आर्थिक मदत थुट्टे कुटुंबाला प्रदान करण्यात आली.