मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) :
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज (शनिवार, ३० ऑगस्ट) मलकापूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते.
मुख्य मागण्या:
शेतकऱ्यांना थकित पिक विमा त्वरित द्यावा
सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे
विवरा गावातील सोलर कंपनीचे अतिक्रमण हटवावे
शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी सुरू करावी
कापसावरील आयात शुल्क पुन्हा लागू करावे, तसेच सोयाबीन डीओसी व सोयापेंड निर्यातीला परवानगी द्यावी
तुपकर आक्रमक…
मोर्चाला संबोधित करताना रविकांत तुपकर म्हणाले,
“शेतकऱ्यांची ही लढाई दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे. सरकारने कापसावरील आयात शुल्क काढल्याने कापसाचे भाव घसरण्याची शक्यता आहे. सरकारने आयात-निर्यात धोरण तातडीने बदलावे. सोयाबीन शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठी सोयापेंड निर्यातीला परवानगी द्यावी. निवडणुकीपूर्वी सरकारने कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे. पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना थकित विमा तातडीने द्यावा. आत्ता आम्ही शांततेने आंदोलन करतोय, पण सरकारने दिरंगाई केली तर आम्ही आक्रमक होऊ.”
मोर्चात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
जनता चौकातून तहसील कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने पायी मोर्चा काढला. शांततेत झालेल्या या आंदोलनातून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी झाली.
पोलीस बंदोबस्त व प्रशासनाला इशारा
मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तुपकर म्हणाले की, “शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.”
या मोर्चाच्या आयोजनाची जबाबदारी अमोल राऊत व सचिन शिंगोटे यांनी पार पाडली. यावेळी सचिन पांडुळे, दामोदर शर्मा, गजानन भोपळे, विश्वास पाटील, प्रविण पाटील, रंजीत डोसे, हर्षल मोरे, गोपाल रायपुरे, भागवत अढाव, विलास इंगळे, सुरज कोलते, गजानन नाईकवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा मोर्चा शेतकऱ्यांच्या एकतेचा आवाज ठरला असून, पुढील काळात या आंदोलनाचा वणवा राज्यभर पसरू शकतो, असा इशारा तुपकर यांनी दिला.