चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):देऊळगाव घुबे येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जानकीदेवी विद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) शिबिर कोनड येथे गेल्या सहा दिवसांपासून उत्साहात सुरू होते. आज या शिबिराची थाटामाटात सांगता झाली.
या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय शेनफडरावजी घुबे होते, तर चिखली येथील नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
यावेळी विशेष उपस्थितीत राजीव जावळे, माजी सरपंच पंजाबराव जावळे, सरपंच संजय वानखेडे, माजी सरपंच दादाराव सुरडकर, ग्रामपंचायत सदस्य रामदास झाल्टे यांच्यासह ग्रामसेवक डुकरे साहेब, प्राचार्य हरिदास घुबे, शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सात दिवसांच्या शिबिराचा सविस्तर आढावा प्रा. उद्धव घुबे यांनी सादर केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची, श्रमदान, सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. तसेच कोनड येथील ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मार्गदर्शन करताना नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड म्हणाले की, “राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे शिक्षणातून आत्मनिर्भरतेकडे जाण्याचे प्रभावी माध्यम आहे. या शिबिरातून विद्यार्थी सुसंस्कृत नागरिक व जबाबदार व्यक्तिमत्त्व कसे घडवू शकतात, याची दिशा आजच निश्चित केली पाहिजे.” तसेच त्यांनी ग्रामस्थांसाठी शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी राजीव जावळे यांनी जानकीदेवी विद्यालय हे परिसरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे व्यासपीठ असल्याचे मत व्यक्त केले. तर माजी सरपंच दादाराव सुरडकर यांनी रासेयो शिबिरातील विद्यार्थ्यांनी आपल्या सेवाभावी कार्यातून व पथनाट्याद्वारे ग्रामस्थांची मने जिंकली, असे गौरवोद्गार काढले.
अध्यक्षीय भाषणात शेनफडरावजी घुबे यांनी सांगितले की, विद्यालयाचा प्रत्येक विद्यार्थी उत्तम माणूस व खेळाडू वृत्तीचा नागरिक घडावा, यासाठी शिक्षक अविरत परिश्रम घेतात. याचाच परिणाम म्हणून या गावातील अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी हे विद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा राऊत व दिव्या काकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. पुनम घुबे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा. उद्धव घुबे, प्रा. गजानन मिसाळ, प्रा. संतोष मिसाळ, प्रा. अमोल डुकरे, प्रा. प्रमोद चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षकवृंदाने परिश्रम घेतले. यावेळी प्राचार्य हरिदास घुबे यांनी सर्वांचे कौतुक करून आभार मानले.














