सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) –राज्य सरकारच्या कृषीविरोधी धोरणांवर, वाढत्या बेरोजगारीवर आणि विकासाच्या प्रलंबित कामांवर आवाज उठवण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने सोमवार,आज रोजी ‘जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चात सिंदखेडराजा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय तावडे, श्याम मेहेत्रे व तालुकाध्यक्ष राजेंद्र अंभोरे यांनी केले आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन सरकारने दिले होते, मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी कायदा करण्याची मागणी आहे. तसेच सिंदखेडराजा मतदारसंघातील अनेक मोठ्या गावांतील विकासकामे रखडली आहेत.
या सर्व मागण्यांसाठी सोमवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे, शिवसेना (उबाठा गट) चे छगनराव मेहेत्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे आणि इतर महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार आहेत.शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक यांनी सरकारच्या विरोधात आपला आवाज उठवण्यासाठी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.













