जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज): पूर्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह तीन दिवसांनंतर आढळून आला. ही घटना १८ जुलै रोजी निमकराड गावाजवळील पूर्णा नदीपात्रात घडली.मृत युवकाचे नाव मंगेश कळस्कार (वय २५) असून तो खामगाव तालुक्यातील वाडी गावचा रहिवासी होता.
तो १६ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास कोणालाही न सांगता घरातून निघून गेला होता. संध्याकाळी कुटुंबीयांना माहिती मिळाली की मंगेशने मानेगाव येथील लहान पुलावरून पूर्णा नदीत उडी घेतली आहे.नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी दोन दिवस नदीपात्रात शोध घेतला, मात्र मृतदेह सापडला नव्हता. अखेर १८ जुलै रोजी मंगेशचा मृतदेह निमकराड येथील पूर्णा नदीपात्रात पाण्यावर तरंगताना आढळून आला. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.
या घटनेची तक्रार मंगेशचे काका सुनील जयराम कळस्कार (वय ४५, रा. सुटाळा, ता. खामगाव) यांनी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंडित करीत आहेत.