मलकापूर पांग्रा (ज्ञानेश्वर कळकुंबे : बुलडाणा कव्हरेज न्युज): गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केशव शिवनी गावाजवळील पुलाला मोठे तडे गेले असून पुलाला भगदाड पडल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.
या पुलावरून सतत पाणी वाहत असल्याने मुख्य गाव आणि तांडा वस्ती यांच्यातील दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ग्रामपंचायत भवन, जिल्हा परिषद शाळा आणि गावातील मंदिर तांडा वस्तीत असल्याने नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पुलावरून सतत पाणी वाहत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. गावकऱ्यांनी पुलावरून जाण्यास मनाई केली असून, पाण्यात काहीच दिसत नसल्याने जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांची मागणी…
गावकरी व सरपंच विकास आंधळे, तसेच उमेश घुगे, केशव गीते, पंडित ससाने, गणेश घुले, गजानन गीते, शोभा गीते, पंचफुला गीते, स्वप्निल बुंधे यांसह इतरांनी प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.