अंढेरा (नंदकिशोर देशमुख- बुलडाणा कव्हरेज न्युज) – बुलडाण्यातील छोट्याशा अंढेरा गावात वाढलेल्या योगेश सानप या तरुणाने थेट दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’ या जगप्रसिद्ध ९० किमी शर्यतीत त्यांनी अवघ्या ७ तास २६ मिनिटे ५८ सेकंदांत धाव पूर्ण करत सिल्व्हर मेडल (रौप्यपदक) मिळवले.ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश न राहता, भारतासाठीही ऐतिहासिक ठरली आहे. कारण, या ९८ वर्षांपासून सुरू असलेल्या स्पर्धेत आजवर केवळ तीनच भारतीय धावपटूंनी अशी कमाल केली आहे – आणि योगेश सानप हे त्यापैकी एक ठरले आहेत.‘
कॉम्रेड्स मॅरेथॉन’ म्हणजे काय?
ही स्पर्धा दरवर्षी दक्षिण आफ्रिकेत आयोजित केली जाते. यामध्ये ८७ ते ९० किमी अंतर पार करावे लागते, तेही खडतर डोंगराळ चढ-उतारांच्या मार्गावरून. यंदाची स्पर्धा पीटरमारिट्झबर्ग ते डर्बन दरम्यान पार पडली. जगभरातून २२,००० पेक्षा जास्त धावपटू यात सहभागी झाले होते.स्पर्धा पूर्ण करणे हीच मोठी गोष्ट मानली जाते, कारण अनेकजण अर्ध्यातूनच बाहेर पडतात. मात्र योगेश यांनी संपूर्ण शर्यत वेळेत पूर्ण करून सिल्व्हर मेडल जिंकले – हे अत्यंत गौरवास्पद आहे.
गावाकडून जागतिक व्यासपीठावर…
योगेश सानप हे अंढेरा (ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा) येथील रहिवासी. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेला हा तरुण सतत मेहनत, फिटनेस आणि ध्येयावर विश्वास ठेवत पुढे गेला. परिस्थिती कधीही अनुकूल नव्हती, पण शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले.आज त्याच्या गळ्यात पदक आहे, हातात तिरंगा आहे आणि डोळ्यांतून स्वप्नं पूर्ण झाल्याचं समाधान झळकत आहे.
तरुणांसाठी प्रेरणास्थान
योगेश सानप यांची कामगिरी केवळ त्यांच्या गावापुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील तरुण धावपटूंना प्रेरणा देणारी आहे. त्यांनी सिद्ध केलं की चिकाटी, मेहनत आणि ध्येयाच्या मागे लागल्यास गावातील साधा तरुणही जागतिक व्यासपीठ गाठू शकतो.– योगेश सानप, धावपटू – अंढेरा.