छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) :वाळूज एमआयडीसी परिसरातील दत्तनगर फाट्यावर नर्स तरुणीला रस्त्यात अडवून छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१८ ऑगस्ट) रात्री घडली.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय नर्सचे लग्न वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकात राहणाऱ्या तरुणासोबत ठरले आहे. रविवारी (१७ ऑगस्ट) ती होणाऱ्या नवऱ्याला भेटायला आली होती. सोमवारी रात्री आठच्या सुमारास दोघे दत्तनगर फाट्यावरील क्लिफ्टन वाईन शॉपसमोर बोलत उभे असताना, अचानक एक कार थांबली.
कारमधून उतरलेल्या व्यक्तीने तरुणीचा हात धरत “चल माझा पगार झाला आहे, तू किती घेणार” असे म्हणून छेडछाड केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे तरुणी घाबरली. मात्र, तिने आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याने आरडाओरड केल्याने तो आरोपी पळून गेला.चौकशीत आरोपीचे नाव जयहिंद लहुसू चव्हाण (रा. रांजणगाव शेणपुंजी) असे समोर आले.
त्यानंतर पीडित तरुणीने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस अंमलदार श्री. तांदळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.