मुंबई (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात टप्प्याटप्याने घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत व्हीव्हीपॅट (VVPAT) मशीनचा वापर केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विरोधी पक्षांनी अनेकदा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधील मतांची जुळवणी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता व्हीव्हीपॅट न वापरण्याच्या निर्णयावर टीका होण्याची शक्यता आहे.
ओबीसी आरक्षणासाठी लॉटरी पद्धत लागू!
या निवडणुकीत ओबीसी (इतर मागासवर्गीय) आरक्षणासाठी लॉटरी पद्धत वापरण्यात येणार आहे. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षण निश्चित असते, मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओबीसी आरक्षणासाठी लॉटरी प्रणाली लागू केली जाणार आहे. हीच पद्धत मागील निवडणुकांमध्येही वापरण्यात आली होती.
मतदार यादी आणि निवडणूक तयारी…
या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार यादीचा आधार घेण्यात येणार आहे. निवडणुकीची प्राथमिक रूपरेषा तयार झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. नाशिक येथे झालेल्या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. या वेळी विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
टप्प्याटप्याने निवडणूक, पहिल्या टप्प्याबाबत निर्णय बाकी…
सर्व निवडणुका एकाचवेळी घेण्याऐवजी त्या टप्प्याटप्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण एकाचवेळी निवडणुका घेतल्यास मनुष्यबळाचा प्रश्न निर्माण होतो. मात्र, कोणत्या स्वराज्य संस्थेची निवडणूक प्रथम होणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.