बुलडाणा (उध्दव थुट्टे पाटील : बुलडाणा कव्हरेज न्युज) नगरपरिषदांच्या आरक्षणानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या चर्चेला वेग आला आहे. येत्या १३ ऑक्टोबर रोजी सर्कलनिहाय आरक्षण जाहीर होणार असल्याने सर्वच सर्कलमध्ये, विशेषत: मासरूळ जि.प. सर्कलमध्ये, राजकीय हलचालींना चांगलाच जोर आला आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून या सर्कल मधील नेते गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, सावडणे, लग्नसोहळयामध्ये न चुकता हजेरी लावत आले आहेत.मात्र तरीही निवडणुकी अनिश्चिततेचे सावट असल्याने उमेदवारामध्ये हवा तितका उत्साह नव्हता.प्रतिस्पर्ध्याच्या गाडीची धुरळ मतदारसंघात उठली की प्रत्येक इच्छुक खडबडून जागा होत होता मात्र आता मात्र जिल्हापरिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आणि दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सर्कलचे आरक्षण जाहीर होणार असल्याने उमेदवारांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
मासरूळ जि.प. सर्कलमध्ये २ पंचायत समिती गण असून या सर्कलमध्ये २१ गावाचा समावेश आहे. हे सर्कल सर्वसाधारण राखीव राहील, अशी इच्छुकांसह सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद अध्यक्षपद ‘सर्वसाधारण’ असल्याने अनेक संभाव्य उमेदवारांना नव्या समीकरणांची गणितं मांडावी लागणार आहेत.
सध्या या सर्कलमध्ये सर्वच पक्षाचे कार्यकर्ते तयारीला लागले असून, ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. ‘साम, दाम, दंड, भेद’ या सर्व युक्तीचा वापर होईल, असे बोलले जात आहे.
भाजपकडून अॅड. सुनिल देशमुख यांचे नाव पुढे येत असून,
शिवसेना (शिंदे गट)कडून श्रीकांत (राजू) पवार, निलेश पाटील गुजर, प्रशांत काळे, गजानन लांडे, रतन नरोटे, संदीप पालकर आणि अमोल शिंदे यांची नावे चर्चेत आहेत.
*राष्ट्रवादी (अजित पवार गट) *कडून मनोज दांडगे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
काँग्रेस पक्षात अरुण तायडे पाटील, विश्वदीप पडोळ, समाधान पायघन यांच्या नावांची चर्चा सुरू आहे, तर उबाठा. शिवसेना गटाकडून माजी जिल्हापरिषद सदस्य जालींदर बुधवत आणि वंचित बहुजन आघाडी कडून मनोज खरात यांची नावेही चर्चेत आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण असल्याने या सर्कलमधील दिग्ज नेते“लाल दिव्याचे” स्वप्न पाहत आहेत. मात्र आर्थिकदृष्ट्या दुबळ्या उमेदवारांसाठी ही लढत कठीण ठरणार, असा अंदाज आहे.
महाविकास आघाडीची युती होईल का, की प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढेल — याबाबत अद्याप स्पष्टता नाही. १३ ऑक्टोबरला आरक्षणानंतरच समीकरण स्पष्ट होईल.
दरम्यान, “कार्यकर्त्यांनी केवळ चटया उचलायच्या आणि मोठ्या नेत्यांनीच उमेदवारी घ्यायची का?” असा प्रश्न स्थानिक पातळीवर विचारला जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये नाराजीही दिसत आहे.
मासरूळ जिल्हापरिषद सर्कलमध्ये मोठ्याप्रमाणात आर्थिक आमिष दाखवले जाणार आसल्याचे बोलले जात आहे .ही निवडणुक शिवसेना, भाजप,राष्ट्रवादी या पक्षासाठी प्रतिष्ठेची बनलेली आहे.
या सर्कलमध्ये नेत्याच्या निकटच्या व्यक्ती उमेदवारी मिळवण्यासाठी जीवाचे रान करीत असून प्रतिस्पर्धी उमेदवारांचे तिकीट कसे कापले जाईल यासाठी सेटलमेंट पॉलटिक्स खेळण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जात आहे.जिल्हापरिषद निवडणुकीत लाखो रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही निगराणीत निवडणुका घेणार असले तरी मात्र हिवाळ्यात होणाऱ्या या निवडणुकीच्या उत्साह पहात निवडणूक जाहिर होण्यापूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
निवडणुका दिवाळीपूर्वी झाल्या असत्या, तर “जनतेचीही दिवाळी झाली असती” अशी स्थानिकांची प्रतिक्रिया आहे. मात्र, आता दिवाळीनंतर निवडणुका झाल्या तरी मतदारांची खरी दिवाळी तेव्हाच होईल, हे मात्र निश्चित!














