मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील एका गरीब मजुराने सावकाराच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजी सुपडा घुगरे (वय अंदाजे ४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी मलकापूर पोलिसांनी सावकार अभिषेक सुनील कापसे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काय घडलं नेमकं?
शिवाजी घुगरे यांनी काही काळापूर्वी अभिषेक कापसेकडून केवळ ६ हजार रुपये उधार घेतले होते. पण त्यावर व्याज व परतफेड करून त्यांनी तब्बल ४० हजार रुपये दिले. इतकं असूनही अभिषेक कापसे याने शिवाजीकडे पुन्हा पैशांची मागणी करत त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.त्यांना धमक्या दिल्या जात होत्या, शिवीगाळ आणि मारहाण केली जात होती. ३ जून रोजी रात्री अभिषेक कापसेने घुगरे यांच्या घरी जाऊन त्यांना घराबाहेर नेऊन मारहाण केली आणि पैशांचा तगादा लावला. ही घटना गावातील रामदास पाटील यांच्या घरासमोर घडली. त्यावेळी रामदास पाटील, मंगेश थोरात, सुनील नेरकर, सुनील ढोले व अमित सोनटक्के हे साक्षीदार होते.
शेवटी आत्महत्येचा मार्ग…
या सततच्या छळामुळे मानसिक तणावात आलेल्या शिवाजी घुगरे यांनी ५ जून रोजी विषारी औषध प्राशन केले. त्यांना तातडीने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी बुलडाण्यात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सुसाइड नोटमध्ये उल्लेख…
शिवाजी घुगरे यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी सावकार अभिषेक कापसेच्या पैशाच्या मागणीमुळे आत्महत्या करत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. पोलिसांनी ती चिठ्ठी जप्त केली आहे.
नातेवाईकांचा संताप!
या घटनेनंतर शिवाजी यांच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलिस ठाण्यासमोर आणून संताप व्यक्त केला. त्यांनी आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.