चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) — चिखली तालुक्यातील गोद्री गावात एका महिला शेतकऱ्याचा मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ही घटना २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता घडली असून, दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे.
गावातील कांताबाई गुलाबराव कुटे (वय ४५) या आपल्या शेतात सोयाबीन सोंगणीचे काम करत होत्या. यासाठी मळणी यंत्र बोलावण्यात आले होते. दिवाळी असल्याने शेतात फारसे मजूर नव्हते. त्या सोयाबीन मळणीयंत्रात टाकत असतानाच अचानक त्यांचे केस मशीनमध्ये अडकले आणि त्या यंत्रात ओढल्या गेल्या. काही क्षणातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आसपासच्या लोकांनी धाव घेऊन कांताबाई यांना मशीनमधून बाहेर काढले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. या दुर्दैवी घटनेची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली आणि सणासुदीच्या आनंदावर विरजण पडले











