डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) डोणगावजवळील अंजनी बुद्रुक येथे २२ नोव्हेंबर रोजी शेतात लोंबकाळलेल्या विद्युत तारेमुळे ६५ वर्षीय शेतकरी बाळकृष्ण राजाराम खोडवे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
खोडवे सकाळी साडेपाचच्या सुमारास आपल्या शेतात स्प्रिंकलरचे शिप बदलण्यासाठी गेले होते. काम करत असताना ८ ते १० फुटांवर लोंबकाळलेल्या विद्युत तारेला लोखंडी स्प्रिंकलरची तोटी लागली आणि त्यांना जोराचा शॉक बसला. जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.
दुपारी ते घरी न आल्यानंतर कुटुंबीयांनी शोध घेतला. पुतण्या ज्ञानेश्वर खोडवे शेतात गेल्यावर स्प्रिंकलरची तोटी तारेला अडकलेली व खोडवे जमिनीवर मृत अवस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती महावितरण, पोलीस व महसूल विभागाला देण्यात आली. महावितरणचे कर्मचारी आशिष वानखेडे व संतोष देशमुख यांनी पंचनामा केला. रामेश्वर खोडवे यांच्या फिर्यादीवरून डोणगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार संजय घिके करीत आहेत.
या घटनेनंतर परिसरातील शेतकरी वर्गात प्रचंड रोष आहे.
लोंबकाळलेल्या तारा, थातूर-मातूर दुरुस्त्या, रोहित्रांवर फ्युज नसणे, तारेखाली चालू असलेली बांधकामे…अशा अनेक त्रुटीमुळे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
शेतकऱ्यांचा सवाल..लाईन रात्री-बेरात्री येते, तारा लोंबकाळलेल्या… अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी करावे तरी काय?















