जालना (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): जालना शहरातील चंदनझिरा भागात गुरुवारी सकाळी ९.१५ वाजता धक्कादायक प्रकार घडला. एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी ‘तुमच्या मुलीचे माझ्यासोबत लग्न लावून द्या’ अशी मागणी करणाऱ्या गुंडाला नकार दिला. त्यामुळे संशयितासह अन्य ८ जणांनी त्या मुलीसह तिच्या कुटुंबावर हल्ला केला.
या हल्ल्यात मुलगी आणि तिचे वडील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्लेखोरांमध्ये ४ महिला, चाकू आणि काठ्यांचा वापर हल्लेखोरांमध्ये सचिन पठाडे, त्याचा भाचा, मेहुणा, राजू, गणेश काकडे यांच्यासह चार महिलांचा समावेश आहे. सर्वांनी रॉड, काठ्या आणि चाकू घेऊन घरावर हल्ला चढवला. घटनेच्या आदल्या दिवशीही दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता.
दार बंद करताना मुलीला ओढले; बहिणीवरही हल्ला…
घराबाहेर झालेल्या गोंधळामुळे अल्पवयीन मुलगी दार बंद करायला आली, तेव्हा सचिन पठाडेने तिचा हात पकडून जबरदस्तीने बाहेर ओढले. त्यानंतर तिच्या बहिणीलाही ओढले आणि दोघींनाही रॉड व काठ्यांनी मारहाण केली. मारहाणीत वडिलांना गंभीर दुखापत झाली, तर मुलीच्या डोक्यालाही चाकू लागल्यामुळे ती जखमी झाली.
पोलीस कारवाई सुरू…
या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.











