“लाडकी बहीण योजनेचा हप्ता अडकलाय; ई-केवायसीच्या घोळानं बुलढाण्यात बहिणींची धावपळ… !”

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार असल्याच्या अफवांमुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे सुमारे २० ते ३० हजार महिलांचा योजनेचा लाभ सध्या थांबविण्यात आला असून, गेल्या दोन महिन्यांपासून हप्ता न मिळाल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी व चिंता व्यक्त केली जात आहे.

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे हप्ते अद्याप अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. यामुळे सोशल मीडियावर लाभ कायमस्वरूपी बंद होणार असल्याच्या अफवा पसरल्या असून, त्याचा थेट परिणाम महिलांच्या मानसिकतेवर होत आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवार (दि. १९ जानेवारी) रोजी बुलढाणा येथील जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात मोठ्या संख्येने महिलांनी गर्दी केली. गेल्या दोन महिन्यांपासून हप्ता का थांबला, याबाबत स्पष्ट माहिती मिळावी यासाठी महिलांनी थेट कार्यालयात चौकशी करत आपली नाराजी व्यक्त केली.

ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान माहितीतील विसंगती, कागदपत्रांतील त्रुटी किंवा तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिलांची नावे थेट लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. परिणामी गेल्या दोन आठवड्यांपासून हजारो महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यात साडेसहा लाखांच्या जवळपास महिला या योजनेचा लाभ घेत होत्या. मात्र, ई-केवायसीतील त्रुटींमुळे सध्या जवळपास २० हजार महिलांचा लाभ तात्पुरता थांबविण्यात आला आहे.

दरम्यान, महिला व बालकल्याण विभागाकडून महिलांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात येत असून, ई-केवायसीतील त्रुटी दूर केल्यानंतर पात्र महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळेल, असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, तोपर्यंत महिलांच्या चिंता कायम असून शासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी लाभार्थी महिलांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!