रायपूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – बुलडाणा जिल्ह्यातील रायपूर येथील प्रसिद्ध खंडागळे रुग्णालयावर १२ जुलै रोजी अवैध गर्भपातप्रकरणी छापा टाकण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली हे पथकाने ही कारवाई केली असून, वर्षभरातील ही तिसरी कारवाई असल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. उज्वल खंडागळे व डॉ. प्रकाश खंडागळे यांच्या रुग्णालयात एका महिलेला गर्भपात करण्यात आल्याची गोपनीय माहिती आरोग्य प्रशासनाला मिळाली. त्यानंतर चिखली येथील तज्ज्ञ डॉक्टर्सच्या पथकासोबत छापा टाकण्यात आला. तपासणी दरम्यान सदर माहिती खरी असल्याचे स्पष्ट झाले.
पूर्वीही अशा कारवाया..
यापूर्वी मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे वर्षभरात हे तिसरे प्रकरण समोर आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
अधिकृत प्रतिक्रिया..
या कारवाईबाबत पीसीपीएनडीटी समितीच्या अॅड. वंदना तायडे यांनी माहिती देताना सांगितले की, “सदर प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.”
नागरिकांमध्ये चिंता
बीड जिल्ह्यातील अवैध गर्भपात प्रकरणांनी राज्यभरात गाजावाजा झाल्यानंतर आता बुलडाणा जिल्ह्यातही अशा घटना घडू लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंता आणि नाराजीचं वातावरण आहे.












