खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) – खामगाव तालुक्यात चोरट्यांनी आता शेतकऱ्यांच्या शेतीउपयोगी साहित्यावर डल्ला मारायला सुरुवात केली आहे. आवार शिवारातील दोन शेतांमधून मोटार, केबल आणि झटका मशीन चोरीला गेल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
शेतकरी शिवशंकर ठाकरे (वय ३०, रा. आवार) यांच्या खामगाव–मेहकर रोडलगतच्या शेतातील विहीर व बोअरवर बसविलेल्या मोटारी चोरट्यांनी लंपास केल्या. यासोबतच त्यांच्या शेतात लावलेली झटका मशीनही चोरीला गेली.
याच परिसरातील गवई यांच्या शेतातील झटका मशीनही चोरट्यांनी चोरून नेली. पावसाने हुलकावणी दिल्याने आधीच सोयाबीन उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यात आता चोरीच्या घटनांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.ठाकरे यांनी या घटनेची तक्रार खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवली असून, पोलीस तपास सुरू आहे.











