खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):भरधाव झायलो वाहनाचा भीषण अपघात टेंभूर्णा येथे घडला. रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीत झायलो घुसल्याने ७५ वर्षीय वृध्दाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन तरुण गंभीर जखमी झाले. ही धक्कादायक घटना १० जानेवारी रोजी दुपारी घडली.
मेहकरकडून खामगावकडे भरधाव येणारी एम.एच. ०४ एफ.आर. २९४८ क्रमांकाची झायलो चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट टेंभूर्णा गावातील रोडलगत असलेल्या टपरीत घुसली. या अपघातात अर्जुन तेल्हारकर (वय ७५) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, कमलेश मोरे व धम्मपाल मोरे हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.













