सिंदखेड राजा ( बुलडाणा कव्हरेज न्युज) – तालुक्यातील जांभोरा गावातील २५ वर्षीय महिलेने आपल्या दीड वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जिंतूर तालुक्यात घडली. १३ ऑगस्ट रोजी जिंतूर–येलदरी रस्त्यावरील मानकेश्वर शिवारातील विहिरीत आई व मुलाचे मृतदेह सापडले.मृतांमध्ये शारदा भरत देशमुख (वय २५) व मुलगा आदर्श भरत देशमुख (वय दीड वर्ष) यांचा समावेश आहे. १० ऑगस्ट रोजी शारदा देशमुख पतीसोबत जालना जिल्ह्यातील शंभु महादेव येथे दर्शनासाठी गेली होती. त्यानंतर तिने माहेर बामणी (ता. जिंतूर) येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. पती भरत देशमुख यांनी तिला रवाना केले, मात्र ती आणि मुलगा माहेरी पोहोचले नाहीत.१२ ऑगस्ट रोजी पत्नी व मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार पतीने शेवली पोलिस ठाण्यात दाखल केली.
दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांना मानकेश्वर शिवारातील मारुती भिकाजी काकडे यांच्या विहिरीत आई-मुलाचे मृतदेह दिसून आले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
या घटनेनंतर मृत महिलेच्या माहेरील नातेवाईकांनी पती भरत देशमुख, सासरे नारायण देशमुख, सासू व जाऊ यांच्याविरुद्ध हुंडाबळी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा जिंतूर पोलिस ठाण्यात नोंदवला आहे. याची माहिती ठाणेदार गजेंद्र सरोदे यांनी दिली.