बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा शहरातील संगम चौक परिसरात अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या एका हॉटेल मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गुरुवार, २३ ऑक्टोबर रोजी पोलिस कर्मचारी कोकिळा तोमर आणि त्यांच्या पथकाकडून शहरात नियमित गस्त सुरू असताना, एका हॉटेलमध्ये १८ वर्षांखालील मुलांना तंबाखू, सिगारेट आणि गुटखा विक्री होत असल्याचे आढळून आले.
त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी त्या हॉटेलवर छापा टाकला असता, आरोपी संतोष शामसुंदर जैस्वाल हा अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना पकडला गेला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून मुद्देमाल जप्त केला आणि आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
शहरात अल्पवयीनांना तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर स्पष्ट बंदी असतानाही अशा घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस प्रशासनाने पुढील काळात अशा प्रकारच्या विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.











