बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):मेहकर तालुक्यात विविध आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून हजारो कुटुंबांचे हक्काचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे. आतापर्यंत तालुक्यात एकूण १९ हजार ६१६ घरकुले मंजूर करण्यात आली असून त्यापैकी ५ हजार ८२७ घरकुले पूर्ण झाली आहेत. उर्वरित १३ हजार ७०० घरकुले सध्या बांधकामाच्या विविध टप्प्यात आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत टप्पा-१ मध्ये २ हजार ७८४ तर टप्पा-२ मध्ये ११ हजार २७७ अशी एकूण १४ हजार ०६१ घरकुले मंजूर झाली आहेत. यापैकी २ हजार ९४५ घरकुले पूर्ण झाली असून ११ हजार ११६ घरकुले प्रगतीपथावर आहेत. रमाई आवास योजनेअंतर्गत २ हजार ४८७ घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यापैकी १ हजार ५९७ घरकुले पूर्ण झाली आहेत, तर ८९० घरकुले प्रगतीत आहेत. शबरी आवास योजनेत १ हजार ०१२ घरकुलांचे उद्दिष्ट असून ३९५ घरकुले पूर्ण झाली असून ५९८ घरकुले बांधकामाच्या टप्प्यात आहेत.
पारधी आवास योजनेत ३२ उद्दिष्टांपैकी ३१ घरकुले पूर्ण झाली असून १ घरकुल प्रगतीत आहे. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत ६१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. एकूणच मेहकर तालुक्यात विविध आवास योजनांमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे.
दरम्यान, सर्व घरकुल लाभार्थ्यांनी आपल्या घरकुलाच्या सद्यस्थितीनुसार संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामरोजगार सेवक यांच्याशी समन्वय साधून पुढील हप्त्याची मागणी विहित नमुन्यात ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अथवा घरकुल कक्षाकडे सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे घरकुलाचे फोटो वेळेत संकेतस्थळावर अपलोड होऊन हप्त्याचे वितरण विनाविलंब होण्यास मदत होणार आहे.
घरकुल योजनेच्या अनुषंगाने कोणीही लाभार्थ्यांकडे पैशांची मागणी केल्यास संबंधितांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे लेखी तक्रार करावी, असे स्पष्ट आवाहन गटविकास अधिकारी, पंचायत समिती मेहकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.














