देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील भिवगाव येथे घरासमोर ठेवलेले सोयाबीनचे कट्टे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ११ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवगाव येथील शेतकरी ओम मधुकर चव्हाण यांनी शेतातून काढलेले सोयाबीन पोत्यांमध्ये भरून घरासमोरील ओट्यावर साठवून ठेवले होते. थंडीचे प्रमाण अधिक असल्याने घटनेच्या रात्री फिर्यादी व त्यांचे मित्र घराबाहेर शेकोटी करून बसले होते. त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी झोपण्यासाठी निघून गेले.
सकाळी उठून पाहिले असता घरासमोरील ओट्यावर ठेवलेल्या एकूण ७२ पोत्यांपैकी ७० पोते, अंदाजे १ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोयाबीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे आढळून आले. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अतोनात मेहनत घेऊन पिकवलेल्या शेतमालावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुधनासोबतच आता घरासमोर साठवून ठेवलेल्या शेतीमालालाही चोरट्यांनी लक्ष्य केल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास देऊळगाव राजा पोलिस करीत आहेत.












