देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील विघ्नहर्ता गणेश मंडळ यावर्षी दुसऱ्या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करत आहे. मंडळाने पारंपरिक ढोल-ताशे, फटाके आणि दिमाखदार मिरवणुकीऐवजी समाजोपयोगी कार्यक्रमांवर भर देत एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत आरोग्य शिबिरे, शालेय साहित्य वाटप, वृक्षलागवड, कीर्तन व शिवव्याख्यान अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून गावातील नागरिकांना आरोग्याबाबत जनजागृती, मुलांना शैक्षणिक प्रोत्साहन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे.
मंडळाचे कार्यकर्ते सांगतात की, “गणपती बाप्पाच्या उत्सवाचा खरा आनंद समाजहितासाठी काम करण्यातच आहे. म्हणूनच प्रत्येक वर्षी आम्ही लोकांसाठी उपयुक्त कार्यक्रमांची आखणी करतो.”
गावातील नागरिक व तरुण मंडळाच्या या उपक्रमांचे स्वागत करत असून, गणेशोत्सव म्हणजे केवळ पूजा व मिरवणूक नसून समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची संधी असल्याचे मत व्यक्त करत आहेत.
या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे देऊळगाव घुबे येथील विघ्नहर्ता गणेश मंडळाचा गणेशोत्सव परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
















