मेरा बु. (कैलास आंधळे : बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतातील धुऱ्यावर तणनाशक फवारणी करत असताना शेजाऱ्यांनी विरोध केल्याने वाद झाला आणि त्याचे रूप गंभीर हाणामारीत बदलले. या मारहाणीत पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना अंढेरा शिवारातील सेवा नगर येथील गट क्रमांक ५६ मध्ये ४ जुलै रोजी दुपारी घडली. प्रमोद महादू सानप (वय ४८) आणि त्यांची पत्नी शारदा सानप हे दोघे आपल्या शेतातील धुऱ्यावर तणनाशक फवारणी करत असताना, शेजारी भगवान तुकाराम नागरे, त्यांचा मुलगा प्रमोद नागरे आणि पत्नी जिजाबाई नागरे यांनी त्यांना अडवले.

“हा धुरा आमचा आहे,” असे म्हणत तिघांनी शिवीगाळ करत लोटपाट केली. भगवान नागरे यांनी हातातील कुऱ्हाड प्रमोद सानप यांच्या डोक्यावर मारली, तर त्यांच्या पत्नी जिजाबाई यांनी लोखंडी खुरप्याने शारदा यांच्या पाठीवर वार केला. प्रमोद नागरेने लोखंडी रॉडने प्रमोद सानप यांच्या डाव्या हातावर घाव घातला. या मारहाणीत प्रमोद यांचा हात फ्रॅक्चर झाला असून डोक्याला आठ टाके पडले आहेत.ही घटना लता निवृत्ती आंबीलकर व निर्मला गणेश बडे यांनी मध्यस्थी करून थांबवली. डॉक्टरांच्या अहवालावरून गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी भगवान तुकाराम नागरे, प्रमोद भगवान नागरे व जिजाबाई भगवान नागरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(२), ११७(२), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.












