देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) — तालुक्यातील दगडवाडी येथे घरकुलाच्या बांधकामावरून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून एका महिलेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौसाबाई हरीभाऊ घुगे (वय ५८, रा. दगडवाडी) यांनी देऊळगाव राजा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास शेजारी आनंदा संपत घुगे, शकुंतला आनंदा घुगे, अविनाश आनंदा घुगे आणि यश अविनाश घुगे यांनी एकत्र येऊन त्यांच्यावर हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले.
आरोपींच्या घरकुलाच्या बांधकामादरम्यान त्यांनी माती फिर्यादींच्या जमिनीत टाकल्याने जाण्या-येण्यास अडथळा निर्माण झाला. ही माती काढून टाकण्यास सांगितल्यावर वाद वाढला. या दरम्यान शकुंतला घुगे यांनी शिवीगाळ केली, अविनाश घुगे यांनी फिर्यादींचे केस पकडून त्यांना खाली पाडले, तर आनंदा आणि यश घुगे यांनी लोखंडी फावड्याने धाक दाखवत चापट आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी आरोपींनी “तुझ्या मुलावर खोटा गुन्हा दाखल करून नोकरीवरून काढू आणि सगळ्यांचा काटा काढू” अशी धमकी दिल्याचे फिर्यादींनी पोलिसांना सांगितले.
या घटनेनंतर देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हवालदार विश्वनाथ काकड हे ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.











