मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज):
झोडगा गावात चोरीच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका नेपाळी मजुराला पकडून मारहाण केली. या मारहाणीत जखमी मजुराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
या प्रकरणात मलकापूर शहर पोलिसांनी सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(2) BNS अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत नेपाळी मजुराचे नाव बुद्धीराम लामण चौधरी (वय 50, रा. नैनीवाल, जि. डांग, नेपाळ) असे असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 7 ऑक्टोबर रोजी सकाळी घडली.
पोलिस घटनास्थळी पोहोचले असता, गावकऱ्यांनी त्या व्यक्तीला बांधून ठेवले होते. त्याच्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्या. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर पोलिसांनी पांडुरंग भोळे, मिलिंद भोळे, गोपाल नारखेडे, सतीश फिरके, गौरव सरोदे, शंकर भारंबे आणि दत्तात्रय खडसे (सर्व रा. झोडगा) या सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक तपासानुसार, गावकऱ्यांनी त्या नेपाळी मजुराला चोर समजून लाठी-काठीने मारहाण केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कौळासे करत आहेत.











