चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिखली तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून बुलडाणा-चिखली महामार्ग दोन ठिकाणी बंद झाला आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार करून चिखली तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना १८ व १९ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी संतोष काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे नंदी नाल्यासह अनेक ठिकाणी पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार दोन दिवसांची सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
यावेळी तहसीलदार काकडे यांनी नागरिकांना इशारा देत सांगितले की, “गरजेपोटीच घराबाहेर पडा. पूरस्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षिततेला प्राधान्य द्या.”
दरम्यान, मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीसह दळणवळणावरही मोठा परिणाम झाला आहे. प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.













