चिखली (ऋषि भोपळे – बुलडाणा कव्हरेज न्युज) – चिखली तहसील कार्यालयात आज अक्षरशः निवेदनांचा पूर आला. अंबाशी, पांढरदेव आणि परिसरातील इतर गावांमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला.
अंबाशी व पांढरदेव येथे तर घरात चक्क पाणी घुसून अन्नधान्य, खाण्याचे साहित्य पूर्णतः खराब झाले आहे.या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी, यासाठी विविध राजकीय पक्षांनी तहसील कार्यालयावर धडक देत निवेदनांचा वर्षाव केला.
स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारात मांडत आहेत. मात्र, अनेक नेते आणि पदाधिकारी फक्त फोटोसेशनसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जात असल्याची शेतकऱ्यांची खंत आहे. तेथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली, फोटो काढले, पण भरपाईसाठी सरकारकडे ठोस पाठपुरावा केला जात नाही, अशी परिस्थिती आहे.अलीकडच्या काळात, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपरिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही नेते पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर फिरू लागले आहेत. मात्र, आता शेतकरीही जागरूक झाला असून, केवळ निवडणुकीच्या काळात येणाऱ्या ‘काळजीवाहू’ नेत्यांना ओळखू लागला आहे.