चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) –चिखली पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर ५ डिसेंबर रोजी दोन मावळ्यांची शिल्पे बसविण्यात आले. या शिल्पांचे फोटो समाधान गाडेकर पत्रकार यांनी सोशल मीडियावर शेअर करत “हे योग्य की अयोग्य?” असा प्रश्न उपस्थित करताच शहरात जोरदार चर्चा सुरू झाली असून नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचे प्रमुख कणा होते. १८ पगड जातींच्या या मावळ्यांनी छत्रपतींच्या नेतृत्वाखाली शिस्त, निष्ठा आणि पराक्रमाचा इतिहास घडवला. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात शिवराय आणि मावळ्यांचा विशेष सन्मान केला जातो.
मात्र पोलीस स्टेशनच्या गेटवर ही शिल्पे बसविल्याने काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“छत्रपतींच्या दरबाराच्या दरवाजावर पहारेकरी उभे असत. त्याचा संदर्भ घेऊन पोलीस स्टेशनच्या गेटवर मावळे उभे करून ठाणेदार नेमकं काय दाखवू इच्छितात?” असा सवाल सोशल मीडियावर नागरिकांनी उपस्थित केला आहे.
काहींच्या चर्चा नुसार…“गेटवर मावळ्यांची शिल्पे लावून छत्रपतींचा अप्रत्यक्ष अनादर होत आहे का…?.”
तर काहींनी सुचवले आहे की,….“सुशोभीकरण करायचे असेल तर पोलीसांचे शिल्प बसवायला हवे होते.”
या संपूर्ण मुद्द्यावर शहरात चर्चा चांगलीच रंगली असून, सोशल मीडियावर ठाणेदार साहेबांवर टीकेची झोड उठत आहे.














