चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): पिक विमा वाटपातील गंभीर विसंगतींवर तीव्र नाराजी व्यक्त करत आज सकाळपासून चिखली येथील पिकविमा कार्यालयात ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोठ्या संख्येने कार्यालयात दाखल झाले असून वातावरण चांगलेच तापले आहे.
मागील महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा होत आहे. मात्र, एका शिवारातील शेतकऱ्याला सहा ते सात हजार रुपये मिळत असताना, त्याच शिवारातील दुसऱ्या शेतकऱ्याच्या खात्यात केवळ शंभर रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे. या विषम व अन्यायकारक वाटपाविरोधात शेतकरी संतप्त झाले आहेत.
यामुळे आज सकाळपासूनच विमा कार्यालयात घोषणाबाजीसह शेतकरी ठिय्या धरून बसले आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी दिला आहे.
दरम्यान, या आंदोलनामुळे पिकविमा कार्यालयाबाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी दिला आहे.