चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील एकूण ९९ ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांकडून मालमत्ता कर व घरपट्टीपोटी डिसेंबरअखेर सरासरी ६८ टक्के करवसुली करण्यात यश आले आहे. गटविकास अधिकारी समाधान वाघ यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतींनी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीवर विशेष भर दिला आहे. त्यानुसार ११ ग्रामपंचायतींकडून घरपट्टीपोटी सुमारे ३.६५ कोटी रुपये, तर पाणीपट्टीपोटी ५.१९ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. मात्र, आजही प्रामुख्याने नोकरदार व निवडणूक लढविणारे नागरिकच कर भरण्यात पुढे असल्याचे दिसून येत असून, इतर नागरिकांकडून कर भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गटविकास अधिकारी समाधान वाघ यांनी सरत्या वर्षात थकीत करवसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत कर भरणाऱ्या करदात्यांना थकबाकीच्या रकमेवर ५० टक्के सवलत देण्यात आली होती. या सवलतीचा लाभ घेत मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी कर भरणा केल्याने ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र, कर सवलतीच्या मुदतवाढीबाबत ग्रामविकास विभागाकडून अद्याप स्पष्ट शासन निर्णय जाहीर झालेला नाही. अभियानाच्या मुदतवाढीसोबतच कर सवलतीचीही मुदत वाढवावी, अशी मागणी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांकडून होत आहे.
ग्रामसेवकांच्या कार्याचे कौतुक….
या मोहिमेच्या यशामागे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. ग्रामसेवकांनी जनजागृती करत थकीत कर वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले. ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष रामेश्वर रिंढे यांच्यासह सर्व ग्रामसेवकांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे संबंधित गावांच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.












