चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आता अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपला असून शहरात आणि तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या अनेक वर्षांत चिखलीच्या राजकारणात झालेले सत्तांतर, विकासकामांचे दावे आणि प्रचारातील आश्वासने यावर जनतेने नेमका कोणावर विश्वास ठेवला, हे निकालातून स्पष्ट होणार आहे.
यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असून सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी काँग्रेस यांच्यात थेट सामना रंगला आहे. ही लढत केवळ नगरपरिषदेपुरती मर्यादित न राहता “ताई-भाऊंची प्रतिष्ठा” पणाला लागलेली निवडणूक म्हणून पाहिली जात आहे.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून पंडितराव देशमुख, तर काँग्रेसकडून काशिनाथ आप्पा बोंद्रे मैदानात असून दोघांनीही जोरदार आणि आक्रमक प्रचार केला. भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असून, काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष व माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्याही असत्ववाची लढाई असल्याने त्यानीही पूर्ण ताकद लावत अनेक राजकीय डावपेच खेळले आहे. त्यामुळे या निकालाचा परिणाम जिल्ह्यातील राजकारणावरही होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत बंडखोर व अपक्ष उमेदवारांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे. काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले प्राचार्य निलेश गावंडे यांनी सुद्धा भाजपाने नगरपालिका निवडणुकीत दूर लोटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (शिंदे गट) यांच्या सोबत हातमिळवणी करीत त्यांच्या पाठिंब्याने मैदानात उडी घेतली आहे. गावंडे हें किती घेणार आणि कुणाची मते घेणार? की दोघांच्या भांडणात विजयी हातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच काँग्रेसशी निष्ठा असलेले किशोर कदम यांनी बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवल्याने काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कदम यांची मते काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकतील का ह्या सुद्धा प्रश्नाचे उत्तर पेट्या उघडल्यानंतर कळणार आहे.
याचबरोबर चिखलीत वंचित बहुजन आघाडीची ताकद बऱ्यापैकी आहे भिसे हे वंचीतची उमेदवारी घेऊन निवडणूक रिंगणात आहे हे दोन्ही उमेदवार काँग्रेसचे गणित बिघडू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान प्रचारात पाणीपुरवठा, स्वच्छता, कर आकारणी, बाजारपेठ, प्रभाग रचना अशा मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोप झाले. सोशल मीडियावरही प्रचाराचा जोर मोठा होता. तरुण मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केल्याचे चित्र दिसून आले आहे.
एकूणच चिखली नगरपरिषद निवडणुकीचा निकाल अतिशय अटीतटीचा ठरणार असून बंडखोर उमेदवारांची मतेच अखेर विजयी उमेदवार ठरवणार असल्याचे चित्र आहे. निकालानंतर चिखलीच्या राजकारणात मोठा बदल होणार, हे मात्र नक्की.














