चिखली नगराची विकासाला साथ, ‘विजयाच्या शिल्पकार’ आ.सौ. श्वेता महाले…! राहुल बोंद्रे यांचे नकारात्मक राजकारण संपले…?

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांचा निकाल जाहीर होताच चिखली शहराने विकासाच्या बाजूने ठाम आणि स्पष्ट कौल दिला आहे. चिखली नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी पंडितराव देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवला असून, या विजयामागे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांचे नियोजनबद्ध, विकासाभिमुख आणि निर्भय नेतृत्व हेच निर्णायक ठरले, अशी ठाम भावना शहरभर व्यक्त होत आहे. हा निकाल म्हणजे केवळ सत्ता परिवर्तन नव्हे, तर चिखलीकरांनी दिलेला विकासाचा जाहीरनामा मानला जात आहे.

या निवडणुकीत जनतेने “भय नव्हे, विकास” हा स्पष्ट संदेश दिला. आमदार श्वेता महाले पाटील यांनी गेल्या काही वर्षांत चिखलीसाठी खेचून आणलेला कोट्यवधींचा विकासनिधी, पाणीपुरवठा योजना, रस्ते, स्वच्छता, भुयारी गटार, घनकचरा व्यवस्थापन, तलाव पुनरुज्जीवन अशा पायाभूत सुविधांचा थेट लाभ नागरिकांना मिळाल्याने त्याचे सकारात्मक प्रतिबिंब मतपेटीत उमटले. नियोजित शहर विकासाचा आराखडा आणि भविष्यासाठी मांडलेली स्पष्ट दिशा यामुळे मतदारांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला.

महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांच्या निकालात चिखली शहराने केवळ नगराध्यक्ष निवडला नाही, तर राजकारणाची दिशा ठरवणारा ठाम संदेश दिला आहे. या विजयामुळे चिखलीत भाजपाचा झेंडा फडकला असला, तरी प्रत्यक्षात हा विजय विकासाच्या राजकारणाचा, पारदर्शकतेचा आणि कामाच्या राजकारणाचा असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. लोकांनी व्यक्तीपेक्षा धोरणे आणि घोषणांपेक्षा कामे यांना महत्त्व दिले, हेच या निकालाचे खरे वैशिष्ट्य आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, या विजयाचे श्रेय ‘चार इंजिनांच्या विकास मॉडेल’ला जाते, केंद्र सरकार, राज्य सरकार, आमदार आणि नगरपालिका. ही साखळी प्रभावीपणे जुळवून देण्यात आमदार श्वेता महाले यशस्वी ठरल्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर असलेला जनविश्वास आणि चिखलीतील जाहीर सभेतून दिलेला विकासाचा स्पष्ट संदेशही निर्णायक ठरला. या निवडणुकीत चिखलीच्या मतदारांनी घराणेशाही, अफवा आणि वैयक्तिक आकसाच्या राजकारणाला नकार देत विकास, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांना प्राधान्य दिले आहे.

दुसरीकडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी निवडणुकीदरम्यान भीतीचे राजकारण केल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. बॉम्बे मार्केट, अतिक्रमणे, हातगाडीधारक व छोट्या व्यावसायिकांना धाक दाखवून मतं मिळवण्याचा प्रयत्न, तसेच प्रशासनातील अधिकारी आणि आमदार श्वेता महाले यांचे पती असलेले श्री. विद्याधर महाले यांच्या बदनामीसाठी राबविण्यात आलेली पद्धतशीर मोहीम या सर्व बाबींना जनतेने ठाम नकार दिला, हे निकालातून स्पष्ट झाले आहे. पुराव्यांपेक्षा अफवांवर आधारित राजकारणाला चिखलीकरांनी स्वीकारले नाही.

विशेष म्हणजे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांचा साधा, सरळ आणि सर्वसामान्यांमध्ये सहज मिसळणारा स्वभाव, लोकांशी थेट संवाद आणि पारदर्शक कारभाराची हमी यामुळे ते ‘आपला माणूस’ म्हणून पुढे आले. आमदार श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विकासकेंद्रित, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख प्रशासनाची नवी सुरुवात करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन शहराच्या प्रगतीसाठी काम करण्याची त्यांची भूमिका नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करत आहे.

या निकालाने एक गोष्ट निर्विवाद ठरली आहे..चिखलीला घराणेशाही, अफवा आणि भय नव्हे; तर विकास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख प्रशासन हवे आहे. भारतीय जनता पक्षच्या माध्यमातून हीच अपेक्षा पूर्ण होईल, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला; तर काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणाला शहराने ठाम नकार दिला आहे.

एकूणच, चिखली नगरपरिषदेत भाजपाचा झेंडा फडकला असून, आमदार श्वेता महाले पाटील या या विजयाच्या खऱ्या शिल्पकार ठरल्या आहेत. या जनादेशामुळे चिखलीच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळेल आणि शहर विकासाच्या नव्या उंचीवर जाईल, असा ठाम विश्वास नागरिक आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे…

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!