चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – चिखली शहरात २७ ऑगस्ट रोजी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. जडीबुटी विक्री करणाऱ्या फिरत्या विक्रेत्यावर दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून गावगुंडाने चाकू हल्ला केला. या हल्ल्यात विक्रेता गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
गणेश गजराजीसिंग ठाकूर (३८, रा. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती) हे आपल्या आई-वडिलांसोबत जडीबुटी विकून उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपासून ते जाफ्राबाद रोड परिसरात वास्तव्यास होते. याच भागातील शेख शकील शेख इसराईल उर्फ शक्कू (२८, रा. गौरक्षण वाडी, चिखली) हा वारंवार त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता.
२७ ऑगस्ट रोजी सकाळी शकीलने ठाकूर यांना अडवून पुन्हा पैसे मागितले. त्यांनी नकार दिल्यावर शकीलने चाकूने गळ्यावर वार केला. या हल्ल्यात ठाकूर गंभीर जखमी झाले. नागरिकांच्या मदतीने त्यांना चिखली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपी शकीलला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून फिरत्या विक्रेत्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.











