बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील बस स्थानकावर शुक्रवारी दुपारी मोठी चोरीची घटना घडली. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.
लिलाबाई दगडुबा गोफणे (वय ६८, रा. जाफ्राबाद, जिल्हा जालना) या आपल्या नात श्रुती (वय ९) सोबत बुलढाणा बसस्थानकावरून जाफ्राबादला जाण्यासाठी आल्या होत्या. दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास जाफ्राबादची बस लागल्याने त्या दोघी बसमध्ये चढत होत्या. बसमध्ये मोठी गर्दी असल्याने गर्दीतून चढताना त्यांच्या नकळत गळ्यातील सुमारे ५ ग्रॅम वजनाची, अंदाजे २० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोथ (मनी-मंगळसूत्रासह) चोरट्याने लंपास केली.
ही घटना लक्षात येताच संतोष राजेंद्र साबळे (वय ३५, रा. जाफ्राबाद, सध्या सानेनगर, बुलढाणा) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस हवालदार दत्तात्रय नागरे मापोनि यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.














