शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेवर दबाव टाकत तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून पती, सासू, सासरे आणि दीर यांच्याविरोधात शेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना धुळे येथील समता नगर, दुध डेअरी रोड (हिरे मेडिकल कॉलेज जवळ) येथे १२ जून २०२३ ते २१ एप्रिल २०२४ दरम्यान घडली.
फिर्यादी सौ. प्रांजली सागर चव्हाण (वय २९, रा. मेहकर, ह.मु. स्टेट बँक कॉलनी शेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर सुरुवातीला १५ दिवस सासरी चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर सासू-सासरे प्रल्हाद विश्वनाथ चव्हाण आणि लता प्रल्हाद चव्हाण यांनी “तुझ्या वडिलांकडून पैसे घेऊन ये, तुझा पती दवाखाना टाकणार आहे” असा तगादा लावून टोमणे मारण्यास सुरुवात केली.
दरम्यान, पती सागर प्रल्हाद चव्हाण दारूच्या नशेत वारंवार वाद घालून तिला मारहाण करत असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या सर्व त्रासामुळे प्रांजली चव्हाण यांनी शेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी शेगाव पोलिसांनी सागर प्रल्हाद चव्हाण (वय ३५), प्रल्हाद विश्वनाथ चव्हाण (वय ६०), लता प्रल्हाद चव्हाण (वय ५५), आणि राम प्रल्हाद चव्हाण (वय २७, सर्व रा. पटवारी कॉलनी, संभाजीनगर, मेहकर) या चौघांविरुद्ध भादंवि कलम ४९८(अ), ३२३, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नापोकॉ निलेश गाडगे करीत आहेत.











