मिर्झानगरात बिबट्याची दहशत..! CCTVत कैद, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याने बुलढाणा शहरातील मिर्झानगर परिसरात थेट एन्ट्री घेतल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून तो चक्क गल्लोगल्ली फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. जंगलातून थेट मानवी वस्तीत आलेल्या या बिबट्यामुळे मिर्झानगरवासीयांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मिर्झानगर व लगतचा परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने येथे बिबट्यांसह हिंस्त्र प्राण्यांचा वावर पूर्वीपासून आहे. मात्र शहरातील मोकाट कुत्रे व डुकरांच्या शिकारीसाठी बिबट्या आता घरांच्या दारापर्यंत येऊ लागल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. यापूर्वीही पाळीव कुत्र्यांची शिकार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान, बिबट्याचा वाढलेला वावर लक्षात घेता वनविभागाने परिसरात गस्त वाढवली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रात्री एकटे बाहेर पडू नये, लहान मुलांना घराबाहेर सोडू नये, परिसरात कचरा टाकू नये तसेच बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बिबट्या थेट मानवी वस्तीत वावरत असल्याने रात्री कामावरून घरी परतणारे नागरिक, पहाटे फिरायला जाणारे ज्येष्ठ आणि लहान मुले यांच्यात भीतीचं सावट पसरलं आहे. परिणामी, रात्री बाहेर पडणं बंद झालं असून लहानग्यांचा खेळही थांबला आहे. मिर्झानगरमध्ये सध्या एकच चर्चा —“बिबट्या कधी आणि कुठे दिसेल?”

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!