भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन; प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष….

चिखली (महिंद्र हिवाळे- बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या पुणे विभागाच्यावतीने प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ १५ मे रोजी चिखली येथील भूमी अभिलेख कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. या आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांनी आपले रोजचे कामकाज नियमितपणे केले, मात्र काळी फित लावून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला.

या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय संघटनेने यापूर्वी ४ ते ५ मार्च दरम्यानही आंदोलन करत शासनाच्या अनास्थेविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर ३ मार्च रोजी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत शासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याने पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग पत्करण्यात आला. संघटनेच्या म्हणण्यानुसार, सरकारकडून वेळोवेळी आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नाही.

या पार्श्वभूमीवर, १५ मेपासून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला होता. त्यानुसार चिखलीसह इतर ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून आंदोलनात सहभाग घेतला. शासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पुणे विभागीय अध्यक्षांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!