चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – चिखली तालुक्यातील खैरव फाटा (चिखली-मेहकर रोड) येथे काल (दि. १४ जुलै) रात्री ८ वाजता ट्रक आणि पॅसेंजर अपे गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृतकाचे नाव मधुकर रामचंद्र वाघ (वय ६२, रा. आमखेड, ता. चिखली) असे असून, त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे नातेवाईक सुनील विष्णू वाघ (वय ३५, रा. आमखेड) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अपघात इतका भीषण होता की, पॅसेंजर अपे गाडीचा पुढचा भाग अक्षरशः चुरडून गेला. अपघातानंतर काही काळ रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून, मृतदेह चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नागरिकांत या अपघाताबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. खैरव फाटा परिसरात सतत अपघात घडत असल्याने येथे वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.













