चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात बिनधास्त सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीचे थैमान काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. सलग तिसऱ्या दिवशी अशाच एका अपघातात चिखली शहरातील खामगाव चौफुली परिसरात आंबे घेऊन जाणाऱ्या ट्रकला भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर घडला.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर भरधाव वेगात येत ट्रकला धडकला. धडकेची तीव्रता इतकी होती की ट्रकचा पुढील भाग अक्षरशः चिरडला गेला.घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त टिप्पर पोलिस ठाण्यात नेण्यात आला आहे. मात्र, दुसरे वाहन घटनास्थळावरून हटवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. अद्याप या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही.
या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट असून, महसूल विभाग व पोलिस यंत्रणा यांच्याकडून याबाबत होत असलेल्या सौम्य कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांचा आरोप आहे की, अशा घटनांमागे आर्थिक व्यवहार आणि राजकीय दबाव असू शकतो.
सतत घडणारे अपघात, वाढती जीवितहानी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे.