सिंदखेड राजा (सचिन खंडारे:बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील शिंदी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतजमिनी खरडल्या गेल्या, पिकांचे मोठे नुकसान झाले, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरून साहित्य वाहून गेले. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच गावातील घरांवर भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.
यावेळी त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले. “नुकसानग्रस्त शेतकरी व गावकऱ्यांना तुटपुंजी नव्हे, तर भरीव मदत शासनाकडून मिळवून देण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. आम्ही नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत,” असे आश्वासन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले.
यावेळी गावातील नागरिक, महसूल विभागाचे अधिकारी, तसेच स्थानिक नेते श्री. गंभीरराव खरात, योगेश जाधव, सरपंच पती अशोक खरात, युवासेना तालुका प्रमुख संदीप मगर आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.