.साखरखेर्डा (राहुल साबळे- बुलडाणा कव्हरेज न्युज): बाळ समुद्र येथील जवान गणेश गजानन भंडारे यांचे ६ मे रोजी कुंडपाळ (ता. लोणार) येथील शिवानी गजानन राऊत हिच्याशी विवाह झाले. पण लग्नाचे तीनच दिवस झालेले असताना, ९ मे रोजी देशसेवेसाठी जम्मूतील अखनूर सीमारेषेवर हजर होण्याचे आदेश गणेश यांना मिळाले. हळदीचा रंग अंगावर, हातावर मेहंदी असतानाच गणेश यांनी एक क्षणही न दवडता देशसेवेसाठी हजर राहण्याचा निर्णय घेतला.
गणेश हे भारतीय लष्करात कार्यरत असून, देशात सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गणेश यांनाही तात्काळ सेवास्थळी रवाना व्हावे लागले. गणेश यांनी ४५ दिवसांची सुट्टी घेऊन लग्नासाठी गावी आले होते. पण देशप्रेम आणि कर्तव्य भावना अधिक ठरली. “देशापेक्षा मोठे काही नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या पत्नी शिवानी यांनीही “ही वेळ कठीण असली तरी देशसेवा सर्वात मोठे कर्तव्य आहे,” अशी भावना व्यक्त केली आहे.
लग्नानंतर नवदाम्पत्याने संसाराची स्वप्ने पाहायची, एकमेकांसोबत वेळ घालवायचा, अशा अनेक योजना असतात. मात्र गणेश यांनी देशसेवेच्या कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत त्या सगळ्याला तात्पुरती तिलांजली दिली. त्यांच्या या समर्पणाचे गावकऱ्यांकडून, नातेवाइकांकडून आणि परिसरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.