इसरूळ (भिकनराव भुतेकर : बुलडाणा कव्हरेज न्युज) बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशन चे नाव नेहमीच चर्चेत असते. या पोलीस स्टेशन च्या हद्दीमधील अनेक गावामध्ये अवैध धंदे बोकाळले असून दादागीरी वाढली आहे. गुन्हेगार बिनधास्त मोकाट फिरत आहे. अशीच घटना या पोलीस स्टेशन अंतर्गत इसरूळ तालुका चिखली येथील ग्रामपंचायत चे शिपाई नंदकिशोर शहाणे यांच्या घराशेजारी राहणारा तरुण नामे प्रशांत भगवान बोरूळ वय ३५ याने जुन्या वादातून त्यांच्या घराच्या दरवाजा, खिडकीवर दगड, वीटा फेकून ग्रा.पं. शिपाई व त्यांच्या वडिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना १८ जून रोजी सायंकाळी ६ वाजता घडली.
याबाबत फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन ला त्याच दिवशी रात्री ८ वाजता अंढेरा पोलीस स्टेशन ला रीतसर तक्रार दिली. परंतु अंढेरा पोलीस स्टेशन च्या वतीने तक्रारीचे गांभीर्य लक्षात न घेता त्यावर कोणतीही दखल न घेतल्याने जिवाच्या भीतीपोटी ६-७ दिवसांपूर्वी ग्रामपंचायत च्या शिपायाने आपण आपल्या वृद्ध वडिलांना घेऊन गाव सोडून गेल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिकांना शिपाई गाव सोडून गेल्याने ग्रामपंचायत संबधित कामासाठी विलंब होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की इसरूळ नवीन गावठाण येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिराजवळ ग्रामपंचायत चे शिपाई नंदकिशोर श्रीराम शहाणे, व त्यांचे वडील श्रीराम शहाणे सेवानिवृत्त ग्रा.पं. शिपाई हे गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर २००७ पासून राहतात. त्यांच्या घराशेजारी राहणारे भगवान बोरूळ हे आपल्या कुटुंबासह राहतात. २००७ पासून शेजारी राहत असलेल्या या दोन कुटुंबामध्ये १२ फेब्रुवारी २०१७ रोजी अचानक मोठा वाद झाला ज्यामध्ये भगवान बोरूळ यांचा मोठा मुलगा सतीश भगवान बोरूळ याने नंदकिशोर शहाणे यांची आई सरस्वती श्रीराम शहाणे यांचा चाकूने भोसकून खून केला. व अवघ्या ४ दिवसांनी १६ फेब्रुवारी २०१७ रोजी राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने फाशी घेतली व आपले जीवन संपविले. यांच्यामुळेच आपल्या मोठ्या भावाने फाशी घेतल्याचा राग मनात ठेवून प्रशांत बोरूळ हा नेहमी आमच्या सोबत भांडणे करत असल्याचे दिलेल्या तक्रारी मध्ये शहाणे यांनी नमूद केले आहे.
तसेच गेल्या ७ -८ महिन्यापूर्वी सुद्धा प्रशांत ने अशीच शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली होती तेंव्हा सरपंच, पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष व त्यावेळच्या संबंधित पंचमंडळींनी याची दखल घेऊन गाव पातळीवर हे प्रकरण मिटविले. बोरूळ यांनी मुलाच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे सांगून बाहेरगावी पाठवतो शहाणे यांना पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊ नये. त्यावर इलाज करतो असे सांगून महिनाभर जळगाव येथे पाठविले होते. याचा सुद्धा राग त्याच्या मनात असल्याचे कळते. यापूर्वी या कुटुंबामध्ये अशी घटना घडल्याने शिवाय शिपाई यांनी आम्हाला भीती वाटते, रात्रभर झोप येत नाही, पोलीस कारवाई केंव्हा करणार..? हाच एकच प्रश्न करत होते.
यापूर्वी घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन इसरूळ चे सरपंच सतीश पाटील, यांनी ठाणेदार रुपेश शक्करगे यांना या संदर्भात दोन-तीन वेळेस फोन केले. तर तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा काळे, पोलीस पाटील जयपाल वायाळ यांनी शहाणे यांना पोलीस येऊन त्यांची चौकशी करतील दिलासा देण्याचा प्रयत्न केला. बुलडाणा कव्हरेज न्युजच्या प्रतिनिधी या विषयी बिट जमादार देढे यांना कॉल केला तर त्यांनी तो पागल आहे, आम्हाला दगड मारील आम्ही लोखंडाचे आहे का.? असा प्रतिप्रश्न करत मी एकटा काय करू.? तुम्ही ठाणेदारांना फोन करा. असे उत्तर दिले.
ठाणेदार रुपेश शक्करगे यांना ४-५ कॉल केले असता त्यांनी कॉल घेतले नाही. त्यामुळे या फिर्यादी बाबत अधिक माहिती घेतली असता फिर्यादीची नोंदच घेतली नसल्याचे कळाले. अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत ४८ गावांचा समावेश आहे. या गावात शांतता राहावी, यासाठी ४८ गावाचे अनेक घटनांचे तपास रखडलेले आहेत. २३ मार्च २०२५ रोजी शेळगाव आटोळ परिसरात अवैध दारूची वाहतूक करणाऱ्याचा पाठलाग करतांना झालेल्या अपघातात पोलीस शिपाई भागवत गिरी यांचा जागीच दुर्दैवी असा मृत्यू झाला तर बिट जमदार रामेश्वर आंधळे हे गंभीर जख्मी झाले. त्यानंतर भरोसा गावासह अनेक गावात अवैध दारू विरोधात महिलांनी मोर्चे काढले एवढी गंभीर घटना आहे व मोर्चे निघाले आता अंढेरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार अवैध दारू विषयी काहीतरी ठोस कारवाई करतील असे वाटत असतांना ११ एप्रिल २०२५ रोजी बायगाव खुर्द येथे अवैद्य दारू पकडण्यासाठी गेलेले बिट जमादार देढे साहेब यांना दारू विक्रेते यांनी मारहाण करून डोके फोडल्याने ५ जणावर गुन्हा दाखल करावा लागला अशा अवैध धंद्यातून पोलीस शिपायांना होत असलेली मारहाण व जीव गमवावा लागत असल्याने त्यांच्यामध्ये एक भीतीचे वातावरण तयार झाले.
एकीकडे वाळू माफियांनी पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून खडकपूर्णा प्रकल्पाच्या नदी उपसा राजरोसपणे दिवस रात्र अवैध रेती ची वाहतूक केली जात आहे. त्याचं बरोबर काही अनेक गावामध्ये,अवैध दारुसह, घुटखा, वरली,पत्ते, यासारखे अनेक अवैध धंदे अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत शेळगांव आटोळ परिसरात सुरू आहे. प्रकरणामुळे अंढेरा पोलीस स्टेशनकडे जनतेचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलून गेला आहे.
२१ फेब्रुवारी २०२५ रोजी अंढेरा येथील संतोष सानप यांच्या शेतात १३ कोटी रुपये किमतीचा लागवड केलेला अफू बुलडाणा गुन्हे अन्वेषण विभाग यांनी पकडल्याने तात्कालीन ठाणेदार विकास पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांच्याजागी त्यावेळचे गुन्हे अन्वेषण विभागामध्ये काम करत असलेले रुपेश शक्करगे हे ठाणेदार म्हणून आले असल्यामुळे आता अवैध धंदे, दादागिरी व गुन्हेगारी कमी होईल असे अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या गावातील नागरिकांना अपेक्षा होती परंतु ती फोल ठरली..!