चिखली (राधेशाम काळे-बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात १८ जून रोजी पोलिसांनी मोठी कारवाई केली. हरणी फाटा येथे अचानक नाकाबंदी केल्यानंतर एका संशयित इसमाकडून ३ लाख २० हजार २१० रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस अधीक्षक श्री. तांबे साहेब यांच्या आदेशानुसार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही नाकाबंदी करण्यात आली होती. या वेळी अमडापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निखिल निर्मळ यांच्या नेतृत्वात PSI युवराज राठोड, ASI निवृत्ती चके, पोना. गजानन काकडे, पो.कॉ. रणजित सरोदे यांचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली.
नाकाबंदी दरम्यान एक इसम मोटारसायकलवरून जात असताना त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव शेख रिजवान शेख उस्मान (वय ४०, रा. शिरसगाव कसबा, जि. अमरावती) असे सांगितले. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने झडती घेतली असता त्याच्या पाठीवरील बॅगमध्ये ३ लाख रुपये आणि खिशातून २० हजार २१० रुपये अशी एकूण ₹३,२०,२१० रोकड सापडली.
तसेच त्याच्याकडे बजाज डिस्कव्हर मोटारसायकल (कींमत अंदाजे ₹३२,०००) आणि तिच्या खरेदीची १७ जूनची चिठ्ठी मिळाली. पुढील चौकशीत उघड झाले की, संबंधित इसमाविरुद्ध राजापूर पोलीस स्टेशन, अमरावती येथे ३.५ लाख रुपयांची ट्रकमधून चोरी केल्याचा गुन्हा आधीच दाखल आहे.
त्यामुळे अमडापूर पोलिसांनी त्याला व संपूर्ण मुद्देमालासह राजापेठ पोलिस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तांबे, अपोअ श्री. महामुनी, उपाविपोअ श्री. सुधीर पाटील, गुन्हा शाखेचे निरीक्षक श्री. लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये अमडापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी प्रदीप अवसरमोल, दीपक सपकाळ यांचेही योगदान लाभले.