बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील भादोला येथील एका तरुणाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
घटनेचा तपशील असा की, पीडित मुलगी आपल्या आजीकडे राहण्यासाठी गेली होती. ८ जून रोजी तिच्या आजीच्या गावातील एका लग्नासाठी वऱ्हाड तिच्या मूळ गावातून आले होते. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला वऱ्हाडासोबत परत पाठवण्याची सूचना आजीला केली. आजीने तिला वऱ्हाडासोबत पाठवले, मात्र ती घरी पोहोचलीच नाही.पालकांनी विचारणा केल्यावर आजीने सांगितले की, मुलगी ६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता आत्याच्या घरी गेली होती. मात्र ती कोणत्याच नातेवाईकांकडे सापडली नाही. मोबाईल नसल्याने तिच्याशी संपर्कही होऊ शकला नाही.शेवटी, १० जून रोजी मुलीच्या काकांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तपास केल्यावर भादोला येथील सुधाकर निकम यानेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे उघड झाले.सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.